महिलांना मंदिरात प्रवेशबंदी घटनाबाह्य; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

0
681

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – केरळमधील सबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशबंदी करणे घटनाबाह्य आहे. त्यामुळे महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात यावा. त्याचबरोबर सबरीमला मंदिरात महिलांनाही पूजा करण्याचा अधिकार असेल, असा महत्त्वपूर्ण निकाल आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाने दिला.  

सबरीमला हे केरळमधील प्रसिद्ध मंदिर असून या मंदिरात १० ते ५० वर्षांच्या महिलांना प्रवेशबंदी होती. रजोनिवृत्ती झालेल्या महिलांनाच प्रवेश दिला जातो. याविरोधात इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनने महिलांच्या प्रवेशबंदीविरोधात न्यायालयात २००६ मध्ये याचिका दाखल केली होती.

गेल्या १२ वर्षांपासून हे प्रकरण लोंबकळत होते. अखेर आज सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निर्णय दिला. घटनापीठात न्या. आर. एफ. नरिमन, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा यांचा समावेश होता. ४ विरुद्ध १ अशा फरकाने न्यायालयाने हा निर्णय दिला.