सपा-बसपाच्या युतीमुळे मोदी, शहांची झोप उडेल – मायावती

0
530

लखनौ, दि. १२ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष सर्व मतभेद विसरून युती करत असल्याची घोषणा बसपाच्या प्रमुख मायावती आणि सपा नेते अखिलेश यादव यांनी आज (शनिवार) येथे संयुक्त पत्रकार परिषदेत केली. २५ वर्षांनंतर ही ऐतिहासिक युती होत असल्याने राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे.    

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची झोप उडवणारी ही युती ठरेल, असे सांगत मायावती यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.  या आघाडीत सपा- बसपाने काँग्रेसला स्थान दिलेले नाही. मात्र, रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात उमेदवार उभा करणार नाही. तर ८० जागापैकी बसपा आणि सपा ३८-३८ जागा लढवणार आहे.

काँग्रेस- भाजपच्या सरकारच्या काळात घोटाळे झाले आहेत, काँग्रेसच्या काळात त्यांना बोफोर्स घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागली होती, तर आता भाजपाला राफेल घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागेल, असा दावा मायावतींनी केला.  यापुढे काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, आम्ही काँग्रेससोबत गेल्याने नेहमी त्यांचा फायदा झाला, पण आम्हाला यातून काहीच मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव  म्हणाले  की, ज्या दिवशी भाजपा नेत्याने मायावतींवर आक्षेपार्ह टीका केली होती, त्याच दिवशी महाआघाडीची पायाभरणी झाली होती. मायावतींचा अपमान हा माझा अपमान आहे, असे  यादव म्हणाले. पंतप्रधानपदासाठी मायावतींना पाठिंबा देणार का? या प्रश्नावर आम्ही कोणाला पाठिंबा देणार हे सर्वांनाच माहित आहे, असे सूचक उत्तर अखिलेश यांनी दिले.