सत्तापर्व; नरेंद्र मोदींनी घेतली दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ   

0
472

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी  आज (गुरूवार) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून  पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील या दिमाखदार सोहळ्याला विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी उपस्थिती लावली.

या शपथविधी सोहळ्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा, माजी गृहमंत्री राजनाथ सिंह, हरसिमरत कौर बादल, रविशंकर प्रसाद,  नरेंद्रसिंह तोमर,   लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान, माजी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण,  कर्नाटकातील भाजपचे वरिष्ठ नेते सदानंद गौडा, महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, पियुष गोयल, शिवसेनेचे अरविंद सावंत, आरपीआय पक्षाचे प्रमुख रामदास आठवले, स्मृती इराणी, डॉ. हर्षवर्धन, अर्जुन मुंडा, रमेश पोखरियाल, माजी परराष्ट्र सचिव डॉ. एस. जयशंकर, डॉ. थावरचंद गहलोत, प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग  या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित  होते.  या सोहळ्यासाठी  तब्बल ६ हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते. यात बॉलिवूडच्या तारे-तारकांचाही समावेश आहे. सुपरस्टार रजनीकांत, अभिनेते कमल हासन यांच्यासह कंगना रणौत, शाहरूख खान, करण जौहर, संजय लीला भन्साळी यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर  बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यांचा समावेश असलेल्या ‘बिमस्टेक’ देशांचे प्रमुखांना निमंत्रण दिले होते.