गडकरी, जावडेकर, सावंत, गोयल, दानवे, आठवले, धोत्रे यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ  

0
594

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरूवार) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील या दिमाखदार  सोहळ्यात महाराष्ट्रातील सात खासदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची  शपथ घेतली.   

माजी वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी, माजी रेल्वे मंत्री पियुष गोयल, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, माजी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून  शपथ घेतली . तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी पहिल्यांदाच राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

या शपथविधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आदीसह प्रमुख नेते उपस्थित होते.

या सोहळ्यासाठी  तब्बल ६ हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते. यात बॉलिवूडच्या तारे-तारकांचाही समावेश आहे. सुपरस्टार रजनीकांत, अभिनेते कमल हासन यांच्यासह कंगना रणौत, शाहरूख खान, करण जौहर, संजय लीला भन्साळी यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर  बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यांचा समावेश असलेल्या ‘बिमस्टेक’ देशांचे प्रमुखांना निमंत्रण दिले होते.