संतापजनक: निगडीत पीटी शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

0
616

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – निगडी प्राधिकरणातील एका नामांकित शाळेतील पीटीच्या (फीजिकल ट्रेनिंग) शिक्षकाने शाळेतल्या १४ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना जानेवारी २०१९ मध्ये घडली.

याप्रकरणी ३४ वर्षीय इसमाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनुराग रामदास हिंगे (रा. देहुगाव) या पीटी शिक्षकाविरोधात बाल लैंगिक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनुराग हा निगडी प्राधिकरणातील एका नामांकित शाळेत पीटी शिक्षक आहे. जानेवारी महिन्यात त्याने शाळेतील १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला शाळेतीलच एका खोलीत बोलावून घेत लैंगिक अत्याचार केला. तसेच या प्रकरणी कोणालाही काही सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना मारुन टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपी शिक्षक अनुराग याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेची माहिती देण्यास तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ भोये यांनी टाळाटाळ केली आहे.