लोकसंख्येच्या बाबतीत २०२७ पर्यंत भारत चीनला मागे टाकेल  

0
489

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – भारतील लोकसंख्या किती वेगाने वाढत आहे, याबाबतचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात २०२७ पर्यंत भारत चीनला मागे टाकेल, असे म्हटले आहे. भारत हा २०२७ पर्यंत जगातील  सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असू शकतो, असे या अहवालात नमूद करण्यात  आले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागाच्या लोकसंख्येसंदर्भात काम करणाऱ्या विभागाने The World Population 2019 : Highlights या नावे एक अहवाल प्रसिध्द केला आहे.  यात पुढील ३० वर्षात जगाच्या लोकसंख्येत दोन अब्जांपर्यंत वाढ होऊ शकते. २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ही ७.७ अब्जांवरून ९.७ अब्जांवर पोहचू शकते, असाही अंदाज या अहवालात  वर्तवला आहे.

२०५० या वर्षापर्यंत लोकसंख्येत जितकी वाढ होईल त्यापैकी अर्धी वाढ ही भारत, नायजेरिया, पाकिस्तान, इथिओपिया, टांझानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिका या देशांमध्ये होईल, असेही या अहवालात म्हटले आहे.

सध्याच्या लोकसंख्येचा विचार करता २०११ च्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या १.२१ अब्ज इतकी आहे तर चीनची लोकसंख्या १.३८ अब्ज इतकी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला येत्या आठ वर्षात मागे टाकेल, असे या अहवालात म्हटले आहे.