श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी येण्यापूर्वी आकुर्डीतील कामे मार्गी लावा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

0
418

आकुर्डी, दि. १८ (पीसीबी) – श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी 21 जून रोजी आकुर्डी येथे येत आहे. पालखीचा आकुर्डीत मुक्काम असतो. पालखी येण्यापूर्वी प्रभागातील स्थापत्य व आरोग्य विषयक तसेच इतर किरकोळ कामे होणे आवश्यक आहे. परंतु ‘ अ ‘ क्षेत्रीय कार्यालयाकडे आर्थिक तरतूद नसल्याने कामांना चालना मिळत नाही. त्यासाठी तरतूद करुन आकुर्डीतील कामे मार्गी लावावीत. वारक-यांना कोणताही त्रास होणार नाही. याची दशता घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिकेकडे केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष अजित गव्हाणे, सरचिटणीस इखलास सय्यद, महिला उपाध्यक्ष आशा शिंदे, महिला सरचिटणीस विमल गायकवाड यांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन पालखी आगमनापूर्वी आकुर्डीतील विविध विकास कामे मार्गी लावावीत. यासाठी भरीव तरतूद करावी अशी मागणी लेखी निवेदन देऊन केली आहे

निवेदनात म्हटले आहे की, 28 मार्च, 11 एप्रिल, व 25 एप्रिल 2022 रोजी ‘ अ ‘ क्षेत्रीय कार्यालय मुख्य समन्वयक तथा शहर अभियंता मा. श्रीकांत सवणे यांना पत्र दिले होते. त्याप्रमाणे काही अंशी कामे झाली आहेत. परंतु स्थापत्य विषयक अद्यापही काही कामे करणे आवश्यक आहे. परंतु तरतूद नसल्याने कामे पूर्ण झाली नाही. आगामी पालखी सोहळा पाहता पालखीचे पूर्व तयारी म्हणून वारक-यांसाठी निवास, मांडप, यासह परिसरातील स्थापत्य विषयक कामांसाठी त्वरित तरतूद मिळणे बाबत विचार व्हावा. ‘ अ ‘ क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून उर्वरित कामे करून घेता येईल. तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खालील कामांना गती द्यावी.

पालखी बरोबर येणाऱ्या दिंड्याची निवासी व्यवस्था करण्यात यावी. पिण्याच्या पाण्याचे टँकरची व्यवस्था करण्यात यावी. पालखी बरोबर येणारे वारकरी व भक्तांसाठी ‘ फिरते शौचालय ‘ विविध ठिकाणी उभी करण्यात यावी. भटक्या श्वानांचा बंदोबस्त व रस्त्यावरील खड्डे बुजविणे. प्रभाग क्र. 21 ची संपूर्ण स्वछता तसेच जागो – जागी पावडर व औषध फवारणी करावी. सायंकाळचा पाणी पुरवठा सुरु ठेवणे. विद्युत पुरवठा खंडित होऊ नये याची दक्षता घेण्याबाबत विद्युत विभाग सतर्क ठेवणे. तसेच महावितरण विभागाशी संपर्क साधने. सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वछता करण्याकरिता चोवीस तास सोय करणे. पालखी नंतर 23 जुन 2022 रोजी संपूर्ण प्रभाग स्वछ करण्याबाबत आरोग्य विभागाला सूचित करावे. कोरोना महामारीच्या संकटा नंतर सुमारे दोन वर्षा नंतर मोठ्या प्रमाणात सोहळा होण्याची शक्यता ग्राह्य धरून सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.