श्रीलंका दौऱ्यासाठी इंग्लंडची स्टोक्स, आर्चरला विश्रांती

0
171

लंडन, दि. ११ (पीसीबी) : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने श्रीलंकेच्या कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड मंडळाने या मालिकेसाठी २३ सदस्यांचा संघ निवडला आहे. पितृत्वाच्या सुटीमुळे रॉय बर्न्स देखिल या मालिकेला मुकणार आहे. आगामी वर्षात इंग्लंड संघाचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम भरगच्च आहे. यात भारताविरुद्धची मालिका, ऑस्ट्रेलियातील अॅशेस, टी २० विश्वकरंडक अशा महत्वाच्या स्पर्धांचा या कार्यक्रमात समावेश आहे. त्यामुळे इंग्लंड निवड समितीने विचार करून स्टोक्स आणि आर्चर यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने म्हटले आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या निवड समितीचे प्रमुख ईडी स्मिथ म्हणाले, ‘स्टोक्स आणि आर्चर यांना विश्रांती देण्यात आली असली, तरी ते दोघेही थेट भारतात येतील. श्रीलंकेत केवळ कसोटी मालिका असल्यामुळे क्रिकेटच्या सर्व प्रकाराशी जुळवून घेणाऱ्या जोस बटलर, सॅम करन, मार्क वूड, ख्रिस वोक्स यांना मात्र स्थान देण्यात आले आहे.’ प्रमुख खेळाडूंना विश्रांती देताना इंग्लंडने डॅन लॉरेन्स याला पदार्पणाची संधी दिली आहे. जॉनी बेअरस्टॉ आणि मोईन अली यांना पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी जेम्स ब्रासी, मॅसन क्रेन, साकिब महमूद, क्रेग ओव्हर्टन, मॅट पार्किन्सन, ऑली रॉबिन्सन, अमर विर्डी यांना राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. हे खेळाडू देखील संघाबरोबरच राहणार आहेत.

इंग्लंड संघ – ज्यो रुट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अॅंडरसन, जॉनी बेअरस्टॉ, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, जॅक क्राऊली, सॅम करन, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डॉम सिब्ले, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, मार्क वूड. राखीव – जेम्स ब्रासी, मॅसन क्रेन, साकिब मेहमूद, क्रेग ओव्हर्टन, मॅथ्यू पार्किन्सन, ऑली रॉबिन्सन, अमर विर्डी