व्हिक्टरच्या गोलमुळे हैदराबादने एटीके मोहन बागानला रोखले

0
317

फातोर्डा दि. ११(पीसीबी) : सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शुक्रवारी एटीके मोहन बागानला हैदराबाद एफसीने 1-1 असे बरोबरीत रोखले. ब्राझीलचा खेळाडू जोओ व्हिक्टर याने पेनल्टीवर गोल केल्यामुळे हैदराबादला एक गुण मिळवता आला. अशा रितीने हैदराबादने आपली अपराजित मालिका राखली आहे. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर उभय संघांमध्ये पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात 56व्या मिनिटाला पंजाबचा युवा स्ट्रायकर मानवीर सिंग याने एटीकेचे खाते उघडले. हैदराबादचा बचावपटू ओडेई ओनैन्डीया याने मैदानावर घसरत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण मानवीरने पायाने चेंडूला नेटची दिशा दिली.

आठ मिनिटांनी प्रतिस्पर्धी हैदराबादचे खाते उघडण्यास मानवीरच कारणीभूत ठरला. हैदराबादचा मध्यरक्षक सौविक चक्रवर्ती याने उजवीकडून चाल रचत मध्य फळीतील निखील पुजारीला पास दिला. त्याचवेळी मानवीरने पुजारीला पाडले. त्यामुळे रेफरी हरीश कुंडू यांनी हैदराबादला पेनल्टी बहाल केली. ती घेण्यासाठी मध्य फळीतील ब्राझीलचा 32 वर्षीय खेळाडू व्हिक्टर पुढे सरसावला. त्याने मारलेला फटका एटीकेएमबीचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याला झेप टाकूनही अडविता आला नाही.

एटीकेएमबीची ही पाच सामन्यांतील पहिलीच बरोबरी असून तीन विजय व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 10 गुण झाले. त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला (5 सामन्यांतून 9) मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला. मुंबई सिटी एफसी 5 सामन्यांतून 12 गुणांसह आघाडीवर आहे. हैदराबादने चार सामन्यांत तिसरी बरोबरी साधली असून एक विजयही त्यांनी मिळवला आहे. त्यांचे सहा गुण असून त्यांनी जमशेदपूर एफसीला (5 सामन्यांतून 6) सरस गोलफरकावर मागे टाकले. हैदराबादचा गोलफरक 1 (3-2), तर जमशेदपूरचा 0 (6-6) असा आहे.

सामन्याची सुरवात चुरशीने झाली. सातव्या मिनिटाला एदू गार्सियाने मध्य फळीतील प्रबीर दास याला उजवीकडे पास दिला. दासला चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी वेळ लागल्यामुळे हैदराबादच्या आकाश मिश्राने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण दासने रॉय कृष्णाला पास दिला. कृष्णाने प्रतिस्पर्ध्यांचे दडपण असूनही प्रयत्न केला, पण चेंडू प्रतिस्पर्धी गोलरक्षक सुब्रतच्या हातात गेला. नवव्या मिनिटाला उजवीकडून प्रीतम कोटल याने पास दिल्यानंतर कृष्णाने उंच उडी घेत हेडिंग केले, पण सुब्रतने उजवीकडे झेपावत चेंडू अडवला.

पूर्वार्धात 11व्या मिनिटाला हैदराबादचा स्ट्रायकर लिस्टन कुलासोने आगेकूच केली, पण एटीकेएमबीचा मध्यरक्षक कार्ल मॅकह्युजने त्याला पाडले. त्यामुळे हैदराबादला फ्री किक मिळाली. हितेश शर्माने डाव्या पायाने गोलक्षेत्रात मारलेल्या चेंडूवर लिस्टनने हेडिंग केले, पण त्यात अचूकता नव्हती. सामन्याच्या 17व्या मिनिटाला गार्सियाने घेतलेल्या फ्री किकवर कृष्णाला फिनिशींग करता आले नाही. 24व्या मिनिटाला लिस्टनने डावीकडे चेंडूवर ताबा मिळवून घोडदौड केली, पण गार्सियाने त्याला पाडले. त्यामुळे हैदराबादला फ्री किक मिळाली. लिस्टनने फ्री किक घेताना मारलेला चेंडू मात्र नेटवरून गेला. त्यानंतर 27व्या मिनिटाला हैदराबादचा मध्यरक्षक निखील पुजारी याचा प्रयत्न अपयशी ठरला.

दुसऱ्या सत्रातील बरोबरीनंतर 71व्या मिनिटाला उजव्या बाजूला कृष्णाने दिलेल्या पासवर मानवीरने प्रयत्न केला, पण चेंडू नेटच्या बाहेरील बाजूला लागला. उत्तरार्धात 78व्या मिनिटाला डावीकडून एटीकेएमबीचा बदली बचावपटू शुभाशिष बोसने आगेकूच केली. पण, हैदराबादचा बचावपटू आशिष रायने त्याला पाडले. त्यामुळे हैदराबादला फ्री किक मिळाली, पण त्यावर काही घडले नाही. अखेरच्या टप्प्यात 82व्या मिनिटाला एटीकेएमबीचा संदेश झिंगन याच्या ढिलाईमुळे हैदराबादचा लिस्टन कुलासो चेंडूवर ताबा मिळवू शकला. लिस्टन कुलासोने गोलक्षेत्रात प्रवेश करीत चेंडू मारला, पण तो ब्लॉक केला गेला.