शेतामधील साठलेल्या पाण्यात पडून सख्ख्या तीन भावांचा मृत्यू

0
213

चाकण, दि. १२ (पीसीबी) : आंबेठान येथील एका शेतामधील खड्ड्यात तीन मुलांचा पडून मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार) घडली आहे. या घटनेमुळे मुलांच्या कुटुंबियांना माेठा धक्का बसला आहे. ही घटना महाळूंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत.

घटनास्थळावरुन तसेच पाेलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार हे आंबेठाण येथे नामदेव भिकाजी लांडगे यांच्या मालकीचे शेत आहे. त्यानजीक भाऊसाहेब निवृत्ती लांडगे यांचे घर आहे. तेथे किशाेर जाेगेश्वर दास हे वास्तव्यास आहेत. दास यांच्या मुलांचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये राकेश किशोर दास (वय 5) , रोहित किशोर दास (वय 8) तसेच श्वेता किशोर दास (वय 4) यांचा समावेश आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांन हळहळ व्यक्त करीत आहेत.

पोलिस उपआयुक्त मंचक ईप्पर यांनी या घटनेविषयी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले घराच्या बाजुला असलेल्या शेतात तयार केलेल्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं होतं. या खड्ड्यातील पाण्यात खेळत असताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने बहिण भावंडे पाण्यात बुडाली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले परंतु त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितलं.

ह्या दुर्दैवी घटनेतील तिन्ही मुलांचे वडील किशोर जोगेस्वर दास हे कामगार आहेत. ते आंबेठान येथे भाऊसाहेब निवृत्ती लांडगे यांच्या खोलीत भाड्याने राहतात. आपल्या तीन मुलांना गमावल्याने दास कुटुंब अक्षरशः कोसळून पडले आहे.