शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू – नरेंद्र मोदी  

0
781

शिर्डी, दि. १९ (पीसीबी)  – मला माहितंय महाराष्ट्रात पाऊस कमी पडला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून केंद्र सरकार उभे राहील, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शिर्डीत घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घराच्या चाव्या वाटण्यात आल्या. त्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “माझ्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पाऊस कमी पडला. मात्र, मी तुम्हाला आश्वासन देतो की, पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत मिळेल. त्यासाठी महाराष्ट्र सरकार जी पावले उचलेल, त्यांच्या खांद्याला खांदा लावून केंद्र सरकार मदत करेल.”, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

तसेच, देशातील शेतकऱ्यांना पाण्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून प्रलंबित योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच माध्यमातून महाराष्ट्रात अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम केले जात आहे, अशी माहिती मोदींनी दिली. “पिकांना दर मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. एमएसपीबाबत शेतकऱ्यांची जुनी मागणी आमच्या सरकारने पूर्ण केली आहे. सरकारने ऊसासह खरीप आणि रबीच्या २१ पिकांना एमएसपीपेक्षा ५० टक्के जास्त दर दिला आहे.”, असेही मोदींनी सांगितले.