स्वारगेट पोलीस चौकीत तरुणाचा चौकशी दरम्यान संशयास्पद मृत्यू

0
1684

पुणे, दि. १९ (पीसीबी) – स्वारगेट पोलिसांनी एका तरुणाला चौकशीसाठी स्वारगेट पोलीस चौकीत आणले होते. मात्र या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.  मृत तरुणाच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीतच तरुणाचा मृत्यू झाल्याचे आरोप केला असून पोलिस त्याचा मृत्यू हा ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे सांगत आहेत. ही घटना गुरूवारी (दि.१८) स्वारगेट पोलीस चौकीत घडली.

अजित अलाफा वडार (वय २०,  रा. घोरपडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी दसरा असल्याने अजित आणि त्याचा मित्र मार्केटयार्ड भागात फुले आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी स्वारगेट पोलिसांनी त्यांना मोबाईल चोरी प्रकरणाची चौकशीसाठी स्वारगेट चौकीत घेऊन गेले होते. दरम्यान त्याच्या नातेवाईकांना हे कळल्‍यानंतर ते सर्व चौकीत आले होते, मात्र नातेवाईकांना अजितशी भेटू दिले नाही त्यामुळे नातेवाईक घरी गेले. यानंतर दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांनी फोन करून अजित सिरियस असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना दिली आणि बोलवून घेतले. त्यावेळी अजित याचा मृत्यू झाला होता असे नातेवाईकांनी सांगितले. मात्र, अजितला ह्रदय विकाराच्या झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर पोलीसांनी अजित याला मारहाण करुन त्याची हत्या केल्याचा आरोप मृत अजित याच्या नातेवाईकांनी केला आहे.