शिवसेनेसाठी १३० जागा?; भाजपचा नवा प्रस्ताव

0
438

मुंबई, दि. २२ (पीसीबी) –  भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यातील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून भाजपने दोन पावले पुढे येत शिवसेनेकडून मित्रपक्षांना द्यावयाच्या ९ जागा धरून त्यांना जवळपास १३० जागा सोडण्याची तयारी दर्शविल्याचे कळते. शिवसेना नेतृत्व मात्र हा आकडा आणखी वाढावा यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाशी संपर्कात असल्याचे खात्रीलायक गोटातून कळते. त्याचवेळी, आज, रविवारी मुंबईत दाखल होणारे भाजप अध्यक्ष अमित शहा हे युतीबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करण्याची चिन्हे आहेत.

भाजप-सेनेतील जागावाटपासाठी गेल्या आठवड्याभरापासून जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप झाल्यानंतर तेही मुंबईमध्ये तळ ठोकून असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे कळते. शिवसेनेला १४४ जागा देण्याविषयी दिल्लीतील भाजपचे नेतृत्व अनुकूल नाही. त्यांना ११५च्या आसपास जागा दिल्या जाव्यात असे मत दिल्लीतील भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या बैठकांमध्ये व्यक्त केले आहे. भाजप स्वबळावर लढल्यास त्यांच्या दीडशेच्या वर जागा निवडून येऊ शकतात असे सर्वेक्षण असल्याने प्रसंगी भाजपने स्वबळावर लढावे असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र युती व्हावी यासाठी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस आग्रही असून त्यासाठी शिवसेनेला जागा वाढवून देण्याबाबत ते देखील केंद्रातील नेत्यांशी सातत्याने संपर्कात असल्याचे कळते. शनिवारी देखील राज्यातील शिवसेना भाजप नेतृत्वामध्ये युतीबाबत चर्चा झाल्याचे कळते. रात्री उशिरादेखील या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याचे कळते.

शिवसेनेला सोबत ठेवण्यासाठी ११५ नव्हे, तर सुमारे १३० जागा देण्याबाबत, तसेच स्वतःकडे सुमारे १५८ ते १६० जागा ठेवण्याबाबत भाजपचे नेतृत्व गांभीयाने विचार करीत असल्याचे समजते. शिवसेनेला देण्यात येणाऱ्या १३० जागांमध्ये मित्रपक्षांसाठी दोन्ही पक्षांनी सोडावयाच्या १८ जागांपैकी ९ जागांचा समावेश असेल असे कळते. शिवसेना मात्र १४४ जागांसाठी प्रयत्नशील आहे. १४४ जागांपैकी ९ जागा आम्ही मित्रपक्षांसाठी सोडू, मात्र त्यापेक्षा आणखी कमी जागा सोडणे आम्हाला जमणार नाही, असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांने ‘मटा’ला सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः दिल्लीतील भाजप नेतृत्वाच्या संपर्कात असून ते पक्षासाठी योग्य त्या जागा मिळवून घेण्यात यशस्वी होतील, असा विश्वासही या नेत्याने बोलून दाखवला. दरम्यान, अमित शहा रविवारी मुंबईत असल्याने जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आणण्यासाठी युतीच्या नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत युतीचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे.