शिवसेनेला ३३ वर्षांत जमलं नाही ते ‘आप’ ने ६ वर्षांत करुन दाखवलं

0
256

पणजी, दि. १० (पीसीबी) : आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये मोठे उलटफेर केलेले पाहायला मिळत आहेत. आम आदमी पक्ष पूर्ण बहुमताच्या आकड्यासह तब्बल ९१ जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला केवळ १७ जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपला अवघ्या २ जागांवर आघाडी घेता आली आहे. भाजपचा जुना साथीदार आणि एकेकाळचा सत्ताधारी असलेला शिरोमणी अकाली दल फक्त ०६ जागांवर यशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळे आता पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येणार असून भगवंत मान हे मुख्यमंत्री होणार हे जवळपास अंतिम झाले आहे.

मात्र त्यापाठोपाठ आता गोव्यातून देखील आम आदमी पक्षासाठी गुडन्यूज येत आहे. गोव्यात आम आदमी पक्षाने दोन जागांवर विजय मिळवला असून पंजाबपाठोपाठ आता गोव्याच्या विधानसभेत देखील अरविंद केजरीवाल यांचा पक्ष दिसणार आहे. गोव्याच्या बाणावली आणि वेळ्ळी या दोन मतदारसंघातून आम आदमी पक्षाने विजय मिळवला आहे. बाणावलीमधून व्हेंझी व्हिएगस यांनी आपच्या झाडू चिन्हावर १ हजार पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे. तर वेळ्ळी या मतदारसंघातून क्रूझ यांनी काठावर विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत शिवसेना देखील ९ जागांसह मैदानात उतरली होती. मात्र शिवसेनेचे सर्व उमेदवार पराभूत झाले असून अवघी त्यांना ०.१८ टक्के मत मिळाली आहेत. अनेक उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. १९८९ साली शिवसेनेनं पहिल्यांदा गोव्याची निवडणूक लढवली होती. यात त्यांनी ४० पैकी ६ जागा लढवल्या होत्या, आणि त्यात एकूण ४ हजार ९६० एवढी मत सेनेला मिळाली होती. एकूण मतांच्या तुलनेत विचार करायचा झाला तर ती ०. ९८ टक्के एवढी होती. त्यामुळे पहिल्या निवडणुकांच्या तुलनेत सध्या शिवसेनेची मत कमीच झालेली पाहायला मिळत आहेत. त्या तुलनेत अवघ्या ६ वर्षांत आम आदमी पक्षाने २ जागांवरील विजयासह तब्बल ६.८१ टक्के मिळवली आहेत. आम आदमी गोव्यात पहिल्यांदा २०१७ साली निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना कोणत्याही जागांवर विजय मिळवता आला नव्हता. मात्र अवघ्या ६ वर्षांत आम आदमी पक्षांने गोव्यात २ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे जे काम शिवसेनेला ३३ वर्षांत जमलं नाही ते आम आदमी पक्षाने ६ वर्षांत करुन दाखवलं आहे असचं म्हणाव लागेल.