अरेरे… गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा पेक्षा कमी मते

0
226

पणजी, दि. १० (पीसीबी) – देशाच्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला आज सुरूवात झाली. पाच पैकी चार राज्यात भाजपचा बोलबाला असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. गोव्यात सेना-राष्ट्रवादी पेक्षा ‘नोटा’ला जास्त मतं मिळाली आहेत.

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर आहे. तर संपूर्ण ताकदीने मैदानात उतरूनही शिवसेना आणि राष्ट्रवादीचा फ्लॉप शो झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे 40 जागा असलेल्या गोवा विधानसभेत सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार गोव्यात शिवसेनेला 0.25 टक्के मतं मिळाली आहेत तर राष्ट्रवादीला सध्या 1.06 टक्के मतं मिळाली आहेत. तर या दोन्हीपेक्षा ‘नोटा’ला जास्त मतं मिळाली आहेत. 1.17 टक्के मतदारांनी नोटा पर्याय निवडला आहे.

दरम्यान, शिवसेनेला गोव्यात पराभव स्विकारावा लागल्याने राज्यात भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे. मागील वेळेस काँग्रेसने गोव्यात सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपने सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे यंदा गोव्यात कोणाचं सरकार स्थापन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.