शिवसेनेने भाजपसोबत यावे – रामदास आठवले

0
375

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : “शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा काढावा आणि भाजपसोबत यावं. शिवसेना येत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी भाजपसोबत यावं आणि सरकार स्थापन करावं,” असं मत रिपाई (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. त्यांनी आज (28 सप्टेंबर) अभिनेत्री पायल घोष कथित अत्याचार प्रकरणी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं.

रामदास आठवले म्हणाले, “संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. शिवसेनेने कॉंग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा काढून शिवसेना-भाजप-आरपीआयचं सरकार बनवावं. उद्धव ठाकरे एक वर्ष मुख्यमंत्री राहतील. उर्वरीत तीन वर्ष देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्यावं. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी अस्वस्थ आहे. जर शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी भाजपसोबत एकत्र यावं आणि सरकार स्थापन करावं.”

रामदास आठवले म्हणाले, “अभिनेत्री पायल घोषसोबत मी अर्धातास चर्चा केली. काहीवर्षांपूर्वी पायलवर अनुराग कश्यप यांनी अत्याचार केला आहे. या प्रकरणी मी विश्वास नांगरे पाटील, अभिषेक त्रिमुखे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे सांगितले आहे. आमचा पोलिसांच्या चौकशीवर विश्वास आहे, मात्र एवढा उशीर लागत असताना कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न आहे.”

“अनुराग कश्यप मुंबईतच आहेत. तरीही त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं नाही. पायलला आपल्या जिवाची भिती आहे. तिने पोलीस संरक्षण मागितले आहे. याबाबत मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलणार आहे. मात्र पायलचे काही बरे वाईट झाले तर त्याची जबाबदारी मुंबई पोलिसांची असेल. आम्ही तपासासाठी आठ दिवसांचा वेळ देतोय. जर योग्य दिशेने कारवाई झाली नाही, तर आम्ही आंदोलन करु. एक-दोन दिवसात आमचे एक डेप्युटेशन अनिल देशमुख यांनाही भेटणार आहे,” असंही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं.

“काय झालं ते पुन्हापुन्हा सांगणं मला योग्य वाटत नाही”
यावेळी पायल घोष म्हणाली, “माझ्यासोबत काय झाले ते मी सांगितले आहे. मला पुन्हापुन्हा सांगणे योग्य वाटत नाही. माझ्यासोबत जे झाले ते कुणासोबतही होवू नये. ज्यांच्यासोबत असं काही झालं आहे त्यांनी न भीता पुढे यावं. मी रामदास आठवले आणि सर्वांची आभारी आहे.”