शिवसेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले, तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू – अशोक चव्हाण

0
768

मुंबई,दि.२७(पीसीबी) – महाविकास आघाडी सरकार स्थापनेसंबंधी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी गौप्यस्फोट करताना घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले असल्याचं सांगितलं आहे. तसंच शिवसेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी यावेळी दिला.

सोनिया गांधी यांचा तीन पक्षांच्या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले असंही यावेळी त्यांनी सांगितलं. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अशोक चव्हाण यांनी, “संविधानाच्या चौकटीतच सरकार चाललं पाहिजे. संविधानाच्या चौकटीबाहेर बाहेर जायचं नाही आणि तसं झालं तर सरकारमधून बाहेर पडायचं, अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली होती. याबाबत संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाहीत. घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेतली. तसं त्यांनी लिहून दिलं असल्यानेच सरकार स्थापन झालं,” अशी माहिती चव्हाण यांनी दिली.