शेळी बनलेल्या शिवसेनेने वाघ असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न आम्ही कदापी खपवून घेणार नाही

0
568

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – सत्तेसाठी काँग्रेससमोर शेळी बनलेल्या शिवसेनेने एका महिलेचा निषेध करून वाघ असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न आम्ही कदापी खपवून घेणार नाही.’ असा पलटवार भाजपची महिला आघाडी आणि पिंपरी-चिंचवडच्या महिला महापौर उषा ऊर्फ माई ढोरे आणि पक्षाच्या महिला शहराध्यक्षा शैला मोळक यांनी करीत शिवसेना व ठाकरे यांना अमृता फडणवीस यांच्याप्रमाणे पुन्हा डिवचले.

काही दिवसांपूर्वी ठाकरे नाव असले, म्हणजे कुणी ठाकरे होत नाही, अशी बोचरी टीका अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर केली होती. त्याला उत्तर म्हणून शिवसेना महिला आघाडीने पिंपरी-चिंचवडमध्ये अमृता यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केले होते. त्यानंतर अमृता यांनी पुन्हा ट्विटरवरच जोडे मारो चा व्हिडिओ शेअर करीत त्यांनी दगडफेक आणि चप्पल दाखवणे हा तुमचा जुना छंद आहे, असे या व्हिडीओखाली म्हणत पुन्हा शिवसेनेला टोला लगावला.

या सर्व घटनाक्रमामुळे मात्र मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस असा वाद पुन्हा उफाळून आला आहे. आता या वादात पिंपरीच्या महापौर आणि महिला शहराध्यक्षांनी उडी घेतली. ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या महिलांचा मान राखणे हे शिवसेनेच्या संस्कृतीत बसत नसल्याचेच महिला शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे, असा हल्लाबोल या दोघींनी केला. इतकेच नव्हे तर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर शिवसेनेने त्यांचा निषेध करायला हवा होता. परंतु, सत्तेच्या लोभापायी ती गप्प बसली.आता,मात्र अमृता फडणवीस यांच्या निषेधासाठी तिने आंदोलन केले. त्यांची ही कृती निंदनीय आहे. अशा शब्दात भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.