शिवसेनेत त्रास होत असेल तर भाजपात यावं ,निवडून देतो

0
284

सिंधुदुर्ग, दि. २४ (पीसीबी) -कोकणात पुन्हा एकदा नाणारच्या मुद्द्यावरुन राजकीय फड रंगला आहे. ज्या ठिकाणी नाणार प्रकल्प होणार आहे, त्या राजापूरमधील शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी प्रकल्पाबाबत काल अचानक जाहीर केलेल्या भूमिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राजन साळवी यांना ही भूमिका महाग पडणार, याची चर्चा होती. अशातच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाचा मुद्दा संपला, असा पुनरुच्चार करुन साळवींना टोला लगावला.

राजन साळनी काय म्हणाले?
नाणार प्रकल्पात स्थानिकांचा विरोध मावळला तर महाविकास आघाडी सरकार पुढाकार घेईल, असं वक्तव्य राजन साळवी यांनी केलं होतं. मात्र जैतापूर, नाणारबाबत मांडलेली भूमिका ही वैयक्तिक आहे, शिवसेनेची नाही. जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा असून 90 टक्के स्थानिकांनी मोबदला स्वीकारला आहे. हे मत माझं वैयक्तिक आहे, स्थानिक ग्रामस्थांची भूमिका मी मांडली, असं साळवींनी स्पष्ट केलं.
नाणार समर्थक आमदार म्हणून निवडून आणू”
राजन साळवी या भूमिकेमुळे पक्षात एकटे पडणार असं दबक्या आवाजात बोललं जात आहे. त्यामुळे साळवी यांना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी निमंत्रण दिलं आहे. नाणारवर घेतलेल्या भूमिकेवरुन राजन साळवी यांना जर शिवसेनेत त्रास होत असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि भाजपात यावं. नाणार समर्थक आमदार म्हणून आम्ही त्यांना निवडून आणू, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी व्यक्त केली. आता राजन साळवी यावर काय प्रतिक्रिया देतात आणि कोणती भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

निलेश राणेंचीही शिवसेनेवर आगपाखड
शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जैतापूर आणि नाणार प्रकल्पाला लोकांचे समर्थन असेल, तर विचार करु असं म्हटल्यानंतर मागून आलेल्या शिवसैनिकांनी त्यांना फटकारले. ही इज्जत एका निष्ठावंत शिवसैनिकाला आजच्या शिवसेनेमध्ये मिळते. ज्याच्याकडे गांधीजी तोच खरा शिवसैनिक हे आज शिवसेनेत चित्र आहे” अशी बोचरी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली