शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी घुमली, कलाबेन डेलकर विजयी

0
296

दादरा नगर हवेली, दि. २ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी घुमली. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा प्रचंड विजय झाला. तब्बल 50 हजाराच्या मताधिक्याने डेलकर विजयी झाल्या. शिवसेनेचा हा महाराष्ट्राबाहेरचा पहिलाच विजय असून या निमित्ताने शिवसेने महाराष्ट्राबाहेर विजयाचं खातं खोललं आहे.

दादरा नगर हवेलीतील माजी खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे लोकसभेची ही जागा रिक्त झाली होती. कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने कलाबेन यांना तिकीट दिलं होतं. आज झालेल्या मतमोजणीत कलाबेन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार महेश गावीत यांचा 47 हजार 447 मतांनी पराभव केला.

22 राऊंडनंतर विजयी
आज सकाळी साडे आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण 22 राऊंड पार पडले. यावेळी कलाबेन यांना एकूण 1,12,741 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार महेश गावीत यांना 63 हजार 382 मते मिळाली.

दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईत आत्महत्या केली होती. मरिन ड्राईव्ह परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचे महाराष्ट्र विधानसभेत पडसादही उमटले होते. मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. 1989 मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते.