वार्षिक 24 टक्के परतावा देण्याचे आमिष देऊन कोट्यावधींची फसवणूक करणारे सोमजी दाम्पत्य पुणे पोलिसांच्या ताब्यात

0
368

पुणे, दि.०२ (पीसीबी) : गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील अनेक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. लोकांची फसवणूक करणाऱ्या सोमजी दाम्पत्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या पोलिसांनी दिल्ली विमानतळा वरुन ताब्यात घेतले आहे. आरोपींना आज सकाळी दिल्ली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ट्रान्झिट रिमांडमध्ये पाठवले आहे. अलनेश अकील सोमजी, डिंपल अलनेश सोमजी (दोघे रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पुण्यातील अनेकांना वार्षिक 24 टक्के परतावा देण्याच्या बहाण्याने गंडा घातला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. शुक्रवारी सोमजी दाम्पत्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. आज या दोघांना दिल्ली विमानतळावर इमिग्रेशनने ताब्यात घेतले. आरोपींना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतल्यानंतर याची माहिती पुणे पोलिसांना कळवण्यात आली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दिल्ली येथे रवाना झाले. पथकाने कायदेशीर कारवाई करुन दाम्पत्याला ताब्यात घेतले. आज सकाळी सोमजी दाम्पत्याला दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने 2 दिवसांचे ट्रान्झिट रिमांड सुनावले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, अंमलदार सौदाबा भोजराव, अमोल पिलाणे, आशा कोळेकर, हेड कॉन्स्टेबल विजय गुरव, संग्राम शिनगारे, सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर यांच्या पथकाने केली.