शिवसेना- भाजप युतीसाठी १५ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार – चंद्रकांत पाटील    

0
768

 कोल्हापूर, दि.१० (पीसीबी) – भाजप युतीबाबत सकारात्मक आहे. मात्र, पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर युतीवर शिक्कामोर्तब करण्यात येईल. त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागेल’, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  म्हटले आहे. राज्यातील लोकसभेच्या ६ आणि  विधानसभेच्या ९५ जागांबाबत असलेला तिढा चर्चेतून दूर करण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. 

मंत्री पाटील कोल्हापूरात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, कर्नाटकातील पोटनिवडणुकीच्या  निकालावरुन युतीचा निर्णय घेतला जाणार नाही. निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. तर शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा एकाचवेळी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. भाजपही त्यास आग्रही आहे. राज्यातील ४८ जागांपैकी ४२ जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. तसेच विधानसभेच्या १९३ जागांबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक आहेत. तर उर्वरीत ९५ जागांबाबत एकमत झालेले नाही.

याआधी लोकसभा व विधानसभेच्या विजयी झालेल्या मतदारसंघांवर दोन्ही पक्षांकडून दावा केला जाणार नाही. इतर ठिकाणच्या जागांबाबत मतदारसंघनिहाय आढावा घेवून मार्ग काढला जाईल. मात्र, युती करायची नसेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता द्यायची असेल, तर एकमेकांच्या विजयी झालेल्या जागांवर दावा केला जाईल. त्यामुळे भाजप-सेनेचे नुकसान होणार आहे, असेही पाटील म्हणाले.