शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा पेच कायम; आढळरावांना कोण रोखणार, विलास लांडे की चंदन सोंडेकर

0
1150

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – भाजप-शिवसेना युती झाल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे स्थान आणखी भक्कम झाले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि शिरूरच्या ग्रामीण भागातील चंदन सोंडेकर यांच्यात चुरस आहे. लांडे हे शहरी भागातील आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने लांडे यांना उमेदवारी दिल्यास ग्रामीण भागातील मतदार आढळराव पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची शक्यता आहे. चंदन सोंडेकर यांना उमेदवारी मिळाल्यास आढळराव पाटील यांची ग्रामीण परिसरात दमछाक होणार आहे. यांसह इतर सर्व राजकीय पर्यायांचा पक्ष पातळीवर विचार सुरू आहे. परंतु, लांडे हे धनाढ्य उमेदवार आणि चंदन सोंडेकर हे सामान्य कार्यकर्ते असल्याने उमेदवारी द्यायची कोणाला?, असा पेच पक्षश्रेष्ठींपुढे उभा राहिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होणाऱ्या मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या यो दोन्ही मतदारसंघात युतीच्या विजयासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. परंतु, राष्ट्रवादीने केलेल्या सर्वेक्षणात या दोन्ही मतदारसंघात घड्याळाची टिक टिक वाजण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे यंदा राष्ट्रवादीने मावळ आणि शिरूरमध्ये जोर लावण्याचा निर्धार केला आहे. मावळ मतदारसंघात अजितदादांचे पुत्र पार्थ पवार हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झालेले आहे. पार्थ पवार यांची उमेदवारी शेवटच्या क्षणी जाहीर करण्याची रणनिती पक्षाने आखलेली आहे. दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघांत मात्र राष्ट्रवादी संभ्रमात असल्याचे चित्र आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर या चार आणि शहरी भागातील भोसरी आणि हडपसर या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या लोकसभा मतदारसंघाची सध्याची एकूण मतदारसंख्या २१ लाख १२ हजार ७८२ आहे. ग्रामीण भागातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी आणि शिरूर या चार विधानसभा मतदारसंघात एकूण १२ लाख ४७ हजार २५८ मतदार आहेत. भोसरी आणि हडपसर या दोन विधानसभा मतदारसंघात ८ लाख ६५ हजार ५२४ मतदार आहेत. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघावर ग्रामीण भागातील मतदारांचा जास्त प्रभाव असल्याचे पाहायला मिळते. आतापर्यंत ग्रामीण भागातील मतदारांच्या जोरावरच शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना तीनवेळा खासदार होण्याचे भाग्य लाभले आहे.

अशा राजकीय परिस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील हे चौथ्यांदा शिरूरच्या मैदानात असणार आहेत. तीनवेळा सपाटून आपटलेल्या राष्ट्रवादीला यंदा आढळराव पाटील यांना चितपट करून दाखवावेच लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने काही उमेदवारांची चाचपणीही केली आहे. त्यामध्ये भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि शिरूरच्या ग्रामीण भागातील तरूण कार्यकर्ता चंदन सोंडेकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. परंतु, या दोघांपैकी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत मात्र राष्ट्रवादीत संभ्रम कायम आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे धनाढ्य उमेदवार आहेत. ते निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करू शकतात. मात्र ते शहरी भागातील असल्याने त्यांना शिरूरच्या ग्रामीण भागातील मतदार स्वीकारतील का?, असा प्रश्न पक्षश्रेष्ठींपुढे उभा ठाकला आहे. ग्रामीण भागातील नेते जरी पक्षाच्या बाजूने असले तरी मतदार मात्र आपल्या भागातील उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बाजूने वळणार याची पक्षाला भिती आहे.

राष्ट्रवादीने ग्रामीण भागातील चंदन सोंडेकर यांना उमेदवारी दिल्यास तेथील मतदारांसमोर आढळराव पाटलांसोबतच आपल्याच भागातील आणखी एका उमेदवाराचा पर्याय असणार आहे. आढळराव पाटील यांना तीनवेळा निवडून दिल्याने सोंडेकर यांना ग्रामीण भागातील मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनीही सोंडेकर यांच्या पाठीशी एकत्रित राजकीय ताकद उभी केल्यास आढळराव पाटील यांची ग्रामीण भागात दमछाक होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दुसरीकडे भोसरी आणि हडपसर या शहरी भागातील दोन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला त्यांच्या हक्काचे मतदान मिळाल्यास शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयासाठी झुंजावे लागण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे लांडे यांच्यापेक्षा सोंडेकर हे राष्ट्रवादीचे सर्वमान्य उमेदवार ठरल्यास आश्चर्य वाटायला नको. आता राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.