शिरूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार -शिवाजीराव आढळराव पाटील

0
142

पुणे, दि. १७ (पीसीबी)- शिवसेनेचे नेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नुकतीच पुणे म्हाडा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. याबाबतची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. यानंतर त्यांनी आज कोल्हापुरात आल्यानंतर करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकूणच पाहता शिरूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला असून त्यांचा पक्का बेत असल्याचे ते सांगतात. यावेळी त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर देखील निशाणा साधला.

पुणे म्हाडाचे अध्यक्ष पद मिळाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ग्रीन प्रोजेक्ट आहे. गोरगरीब जनतेला घर मिळण्याचा संकल्प आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेल. मात्र, याचा अर्थ असा नाही की, मी लोकसभा लढवणार नाही. मला गप्प बसवण्यासाठी हे पद दिलं असा कुणीही गैरसमज करून घेऊ नये, मी 2024 ला लोकसभा निवडणूक लढवणार आणि महायुतीचाच उमेदवार राहणार, असा विश्वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार यात तीळ मात्र शंका नाही, असेही आढळराव पाटील म्हणाले. गेल्या दीड वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात होते. आढळराव पाटील यांना एखादे पद देऊन त्यांना लोकांमध्ये जाता येईल. जनतेची कामे त्यांना करता येईल. निवडणूक आणि या पदाचा काही एक संबंध नाही, असेही ते म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील 48 जागा जिंकण्याची व्यूहरचना आखली आहे.