शिंदे गटाच्या खासदारांत प्रचंड अस्वस्थता, भाजप बरोबरीत वागणूक देत नसल्याची गंभीर तक्रार

0
162

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – शिंदे- फडणवीस सरकारमधील कुरबूर आता चव्हाट्यावर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशीरापर्यंत शिवसेना खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीसह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक घेण्यात आली. केंद्र सरकारकडून त्यांना राज्यातील सत्तेत भागीदार म्हणून समान वागणूक दिली जात नसल्याचा मुख्य मुद्दा पुढे आला आहे. लोकसभेसाठी २२ जागांची मागणी शिंदे गटाने केल्याने भाजप मध्ये अस्वस्थता आहे. दरम्यान, महाआघाडीने ४८ जागांवर १६-१६-१६ असा सर्वसाधारण फॉर्मुला निश्चित करून संभाव्य उमेदवारांची नावेसुध्दा ठरवल्याची माहिती बाहेर आल्याने शिंदे गट आपले अस्तित्व टिकविण्यासाठी आता जोमाने कामाला लागला आहे.

“आम्ही आता भाजपचा एक भाग आहोत, तरीही आम्हाला इतरांच्या बरोबरीने वागवले जात नाही, आम्हाला अधिक निधी आणि समतावादी वागणूक मिळाली पाहिजे” असे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी म्हंटले आहे.

गेल्या जून महिन्यामध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर 13 खासदार शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. निवडणूक आयोगाने अधिकृत पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता दिल्याने त्यांनी शिवसेनेचे संसदीय कार्यालयही ताब्यात घेतले. आता खासदारांना त्यांच्या जागा भाजपसोबतच्या जागावाटपाच्या व्यवस्थेत कायम राहायच्या आहेत आणि त्यासाठी शिंदे आणि भाजप दोघांकडूनही आश्वासन हवे आहे. निवडणुका आल्या की भाजपने प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा उचलावा अशी आमची इच्छा आहे, असे त्यांच्यापैकी काही खासदारांनी बैठकीत सांगितले आहे.

राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही खासदारांनी या बैठकीत चर्चा केली आहे. शिंदेगट यासाठी रणनीती आखत असून, मुंबई आणि ठाण्यातील निवडणुका जिंकणे आणि ठाकरे गटाला मात देणे हे मुख्य ध्येय आहे.

राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तीकर हे मुंबईचे असल्याने ते पक्षाच्या प्रचाराला चालना देणार आहेत. शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षाचे नाव अधिकृतरित्या देण्यात आल्याने ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवकांना संभाव्य उमेदवार म्हणून पहात आहे.