शारदा चिटफंड: राजीव कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती उठवली

0
317

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – शारदा चिटफंड प्रकरणी पश्चिम बंगालचे आयपीएस अधिकारी राजीव कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे. शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी देताना सुप्रीम कोर्टाने सांगितले की सीबीआय आपले काम करू शकते. मात्र कोर्टाचा हा निर्णय सात दिवसांनंतर लागू होणार आहे. या दरम्यान राजीव कुमार यांना कायदेशीर पावले उचलू शकतात. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे प. बंगालच्या ममता बॅनर्जी यांना दणका बसला आहे.

कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्यावर अटकेची टांगती तलवार यामुळे कायम आहे. सीबीआय त्यांना सात दिवसांनंतर अटक करू शकते. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की या सात दिवसांच्या कालावधीत कुमार आपल्या जामीनासाठी कोर्टात अर्ज दाखल करू शकतात. जर त्यांना जामीन मिळाला नाही तर सीबीआय त्यांना अटक करू शकते.

कोलकाताचे माजी आयुक्त राजीव कुमार यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यातील पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. सीबीआयने आरोप केला आहे की बड्या नेत्यांना वाचवण्यासाठी कुमार यांनी घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाता याचिका दाखल करत राजीव कुमार यांना अटक करून चौकशी करण्याची मागणी केली होती.

या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने चिटफंड घोटाळ्याच्या तपासाच्या प्रगतीबाबतही चिंता व्यक्त केली. आतापर्यंत या प्रकरणी झालेला तपास समाधानकारक नसल्याचे कोर्टाने सांगितले.