शाब्बास रे पठ्ठा… भंगारातील साहित्यातून बनवली फोर्ड

0
321

सांगली, दि. १४ (पीसीबी) – गेल्याच महिन्यात सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावात दत्ता लोहार यांनी भंगारातील साहित्यातून मिनी जिप्सी बनवली होती. आता सांगलीतील अशोक आवटी या तरुणाने तयार केलेल्या फोर्ड गाडीची जोरदार चर्चा सुरू आहे. आवटी यांनी जुनी एमएटी गाडी आणि रिक्षाचे साहित्य वापरून १९३० सालच्या फोर्ड गाडीची डुप्लिकेट तयार केली आहे. अवघे तीस हजार रुपये खर्च करून तयार केलेल्या गाडीने फोर्ड कंपनीच्या जुन्या गाडीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

सांगलीताल कर्नाळ रोडवर राहणारे अशोक आवटी यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. लहानपणापासूनच वाहनांचे आकर्षण असल्यामुळे सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी एका गॅरेजमध्ये वाहनांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. सध्या ते सांगली-कर्नाळ रोडवरील एका गॅरेजचे चालक आहेत. आपण स्वतः एक चारचाकी गाडी तयार करावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. यु ट्यूबवरील काही व्हिडिओ पाहून त्यांनी भंगारातील साहित्यातून कार निर्मितीचा ध्यास घेतला. गेल्या दोन वर्षांच्या धडपडीनंतर त्यांनी जुनी एम ८० आणि रिक्षाचे साहित्य वापरून एक कार तयार केली आहे. ही कार फोर्ड कंपनीच्या जुन्या कार सारखीच आहे. हँड किकवर सुरू होणारी ही गाडी पेट्रोलवर चालते. प्रतिलिटर ३० किलोमीटर धावणाऱ्या गाडीत चार माणसं आरामात बसतात.

फोर्डची डुप्लिकेट कार तयार करण्यासाठी अशोक आवटी यांना केवळ ३० हजार रुपये खर्च करावे लागले. या कारमध्ये एलईडी लाईट, इंडिकेटर, हॉर्न अशा सर्व सुविधा आहेत. याशिवाय जुन्या लूकमुळे ही कार विशेष आकर्षण ठरते. सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या अशोक आवटी यांनी तयार केलेल्या या प्रयत्नाचे सांगलीकरांकडून विशेष कौतुक होतंय.