महापालिकेचे धोरण! व्यापारी संकुलातील दुकानांसाठी ‘प्रथम मागणी येईल, त्यास प्रथम प्राधान्य’

0
368

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या व्यापार संकुलातील अनेक दुकाने रिकामी राहत असल्यामुळे महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी स्थायी समितीने केलेल्या ठरावानुसार प्रथम मागणी येईल, त्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर रिक्त दुकान महापालिकेद्वारे वितरित करण्यात येणार आहेत. रिक्त दुकानांसाठी इच्छुक व्यक्तींनी, संस्थांना 21 जानेवारीपर्यंत भूमी आणि जिंदगी विभागाच्या सहायक आयुक्त यांच्या नावाने अर्ज करावे लागणार आहेत.

रिक्त दुकानांकरिता इच्छुक व्यक्तींनी 15 दिवसांच्या आत बंद पाकिटातून महापालिका दरापेक्षा सर्वोच्च दर लेखी स्वरूपात अर्जात नमूद करून अर्ज सादर करावा. 15 दिवसांनंतर एकाच दुकानासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारास लेखी पत्राद्वारे कळविल्यानंतर 30 दिवसांच्या आत डीडीद्वारे रक्कम भरणे बंधनकारक राहील. एकाच दुकानासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींचे समान दर प्राप्त झाल्यास बंद पाकिटातून 7 दिवसांत पुन्हा दर मागवून सर्वोच्च दराने अर्जदारास दुकान वितरित करण्यात येणार आहे.

मासिक भाडेदराने येणारे दुकान किमान सहा महिने आगाऊ भाडे भरून वितरित करण्यात येईल. एकाच दुकानाकरिता दीर्घ मुदतीचे आणि मासिक भाड्याने मिळण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास प्रथम दीर्घ मुदतीच्या अर्जदाराचा विचार करण्यात येणार आहे. दुकानांचे मागासवर्गीय, महिला बचत गट शेतकरी, उत्पादित गट, दिव्यांग या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या दुकानांसाठी अर्ज प्राप्त झाले नाही, तर दुकाने खुले करून पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे. दुकान मंजूर झाले तथापि रक्कम भरली नाही, अशी व्यक्ती, संस्था यांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीत.