शहरातील विविध विकासकामांसाठी २४ कोटी ५२ लाखांच्या खर्चास स्थायीची मंजुरी

0
580

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे २४ कोटी ५२ लाख रूपयांच्या खर्चास आज (बुधवार) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी होते.

महापालिकेच्या मालकीच्या इमारती, कार्यालये, दवाखाने, शाळा, उद्याने आदीसह जमिनीवरील  व छतावरील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची शास्त्रोक्त पध्दतीने साफसफाई व स्वच्छता करण्यासाठी सुमारे १२ लाख ८७ रूपयांच्या खर्चास या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

त्याचबरोबर महापालिकेच्या शाळेतील ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत बसपास योजनेसाठी सुमारे ३ कोटी २० लाख रूपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. तसेच रहाटणी फाटा ते शिवाजी चौकापर्यंतच्या १८.०० मीटर रूंद रस्त्याच्या क्रॉंकिटीकरण कामासाठी १ कोटी ९९ लाख ९९ हजार रूपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.

मोहननगर परिसरातील  मोहननगर प्रवेशद्वार ते मेहता हॉस्पीटल डीपी रस्त्याच्या क्रॉकिटीकरणाच्या कामासाठी १४ कोटी ८५ लाख रूपयांच्या खर्चास या सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच थेरगांव येथील डांगे चौक येथे बांधण्यात येणाऱ्या अंडर पासमधील महावितरणच्या विद्युत वितरण उच्च-लघुदाब वीज वाहिन्या हलविण्याच्या कामासाठी सुमारे ८८ लाख ९४ हजार रूपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.