“शहरातील यंत्रणा कोरोनाला रोखण्यासाठी सज्ज ठेवा”; महापौर माई ढोरे यांचे प्रशासनाला तात्काळ आदेश

0
245

पिंपरी, दि.४ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांचे प्रमाण पाहता महानगरपालिकेची सर्व यंत्रणा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सज्ज ठेवा असा आदेश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला दिला. शहरातील कोरोनारुग्णांना त्वरित वैद्यकीय उपचार घेताना कोणत्याही अडथळ्यांना समोर जावं लागू नये याची पूर्णतः खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या आहेत.

महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसून येत असून यावर काबू मिळवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सर्वंकष आढावा महापौर ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत झालेल्या विशेष बैठकीमध्ये घेतला. यावेळी उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या डॉ. वैशाली घोडेकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आदी उपस्थित होते. शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने विविध पातळीवर उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांचे सहकार्य आणि सहभागामुळे आपण कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित ठेवू शकलो असे नमूद करून महापौर ढोरे म्हणाल्या. कोरोना रुग्ण सध्या मोठ्या संख्येमध्ये पुन्हा नव्याने वाढत असून नागरिकांमध्ये याबद्दल जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड-१९ लसीकरण केंद्राच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा यंत्रणा नेमावी. कोरोना विषयक कामकाज करताना कोरोना बाधित होऊन मरण पावलेल्या मनपा कर्माचा-यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य तसेच अनुकंपा तत्वावर तातडीने नियुक्ती द्यावी, महागड्या रुग्णालयांचे दर सर्वसामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी महानगरपालिकेने आपल्या रुग्णालयांमध्ये अद्यावत सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देशही महापौर ढोरे यांनी यावेळी दिले.