शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

0
510

मोशी, दि. १६ (पीसीबी) – शस्त्र बाळगल्या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याला ताब्यात घेत असताना त्याने पोलिसांना धक्काबुक्की करून पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि. 15) रात्री सात वाजता दक्षिण लक्ष्मीनगर, मोशी येथे करण्यात आली.

निलेश विजय गायकवाड (वय 25, रा. रा. दक्षिण लक्ष्मीनगर, मोशी. मूळ रा. वारजे माळवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई नितीन खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले. पोलीस असल्याचे सांगून त्याला ताब्यात घेत असताना त्याने पोलीस शिपाई नितीन खेसे यांच्याशी झटापटी करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलीस शिपाई भोसले यांना धक्का देऊन खाली पाडले. पोलीस करत असलेल्या सरकारी कामात निलेश याने अडथळा निर्माण केला. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. पोलीस उपनिरीक्षक अशोक तरंगे तपास करीत आहेत.