शस्त्राच्या धाकाने लूटमार करत 10 वाहनांची तोडफोड

0
253

निगडी, दि. १३ (पीसीबी) – एका व्यक्तीला शस्त्राचा धाक दाखवत त्याच्या खिशातून पैसे काढून घेतले. त्यानंतर आजूबाजूच्या दहा वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात तोडफोडीसह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 11) रात्री दहा वाजताच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे घडली.

चोकोबा शिंदे, यश हरी घोंगडे, संदीप प्रेमचंद गोलेछा, आकाश उर्फ छोट्या खडका, तुषार शेंडगे (सर्व रा. निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत रबलजेदंसिंग जागरसिंग सोही (वय 45, रा. ट्रान्सपोर्ट नगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी ट्रान्सपोर्ट नगर येथील एका ढाब्यासमोर थांबले होते. त्यावेळी पाच आरोपी कोयते आणि लाकडी दांडके घेऊन फिर्यादी यांच्याजवळ आले. फिर्यादी यांना शस्त्राचा धाक दाखवून बळजबरीने त्यांच्या खिशातून अडीच हजार रुपये काढून घेतले.

त्यानंतर ढाब्याच्या आजूबाजूला उभ्या केलेल्या दहा टेम्पो आणि ट्रकच्या काचा फोडून 50 हजारांचे नुकसान केले. तसेच आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.