शरद पवार यांची अवस्था शोले सिनेमातील जेलरसारखी – मुख्यमंत्री

0
472

फलटण, दि. १० (पीसीबी) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांना   निवडणुकीत काँग्रेस हरणार असल्याचे आधीच कळल्याने ते बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांची अवस्था शोले सिनेमातील जेलरसारखी झाली आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ बाकी बचे मेरे पिछे आओ असे  पवार म्हणत आहेत. मात्र,  प्रत्यक्षात त्यांच्यामागे कुणीही नाही,  अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज (गुरूवार) केली. 

फलटण येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर  सभेत मुख्यमंत्री बोलत होते.  राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेघ आहे, असे सांगून आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, माती लावून तयार आहेत, आखाड्यात उतरले आहेत. मात्र, प्रतिस्पर्धी पक्षाचे पैलवान आखाड्यात उतरायलाच तयार नाहीत, असे ते म्हणाले.

सुशीलकुमार शिंदे  द्रष्टे नेते आहेत.  त्यामुळेच सोलापूरमध्ये बोलताना शिंदे  यांनी आता आम्ही दोघे फार थकलो आहोत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण  होणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. शिंदे यांना निवडणुकीनंतर काय होणार आहे, ते समजले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अशी होणार की विरोधी पक्ष नेताही त्यांना निवडता येणार नाही. कारण विरोधी पक्ष नेता निवडायचा असेल तर १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा मिळवाव्या लागतात. पण तेवढ्याही जागा मिळणार नाही ही खात्री पटल्यानेच सुशीलकुमार शिंदे विलिनीकरणाची भाषा करत आहेत, असाही टोला फडणवीस यांनी लगावला.