शरद पवार यांचा हिशेब चुकता करण्याची संधी – चंद्रकांत पाटील

0
85

बारामती, दि. १८ (पीसीबी) – महाराष्ट्रात 2019 मध्ये शरद पवारांनी शिवसेनेला युतीतून फोडले. हे कृत्य करून पवारांनी राज्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही फसवणूक केली. आज आम्हाला शरद पवार यांचा हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. मला व माझ्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा पराभव करायचा, बस इतनाही काफी है.., असे आव्हान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटलांनी बारामतीतील महायुतीचा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आता लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. सत्तेचा विजय सुकर करण्यासाठी 16 घटकपक्ष एकत्र येत महायुती तयार झाली आहे. या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपासात समन्वय राखत बूथ लेव्हलपर्यंत काम करावे अशा सूचना पाटलांनी बैठकीत दिल्या. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पवारांवर जोरदार टीका केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने राज्यात महायुतीला चांगले यश मिळाले होते. मात्र पवारांनी महायुती फोडून शिवसेना त्यांच्यासोबत घेतले. ही राज्याची आणि मोदींचीही फसवणूक आहे. यंदा बारामतीतून पवारांचा हिशेब चुकता करण्याची संधी आहे. ती संधी मी आणि माझे सहकारी सोडणार नाही, असे म्हणत पाटलांनी बारामतीतून थेट ज्येष्ठ नेते शरद पवारांना चॅलेंज दिले आहे.

गेल्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपच्या उमेदवाराला पाच लाखाहून अधिक मते मिळाली होती. यंदा उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोबत आहे. त्यामुळे गेल्या वेळी विजयासाठी कमी पडलेली मते यंदा आपल्याला सहज मिळू शकतात. महायुतीत अजित पवार असल्याने गेल्यावेळी विरोधात गेलेली 50 टक्के मते आपल्या उमेदवाराला मिळतील. हा हिशोब केल्यास बारामतीतून महायुतीचा मोठ्या मताधिक्याने विजयी होणार, असा विश्वासही पाटलांनी व्यक्त केला.