शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर भेट; दुष्काळ परिस्थितीवर केली चर्चा  

0
456

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – राज्यातील भीषण दुष्काळ परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे  अध्यक्ष  शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी फळबाग, छावण्या, दुष्काळी भागातील नागरिकांच्या हाताला काम, पाण्याचे योग्य नियोजन, दुष्काळी भागात अन्नधान्य नियोजन, जायकवाडी धरणातील पाणीसाठा या विषयांवर चर्चा झाली.

या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राणा जगजीत सिंह पाटील, दीपक साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी दुष्काळग्रस्त भागात जनावरांच्या छावण्या उशिरा दिल्या गेल्याचा प्रश्न  पवारांनी उपस्थित केला. केवळ ऊस चारा न देता इतर चारा द्यावा, त्याचप्रमाणे चारा अनुदान केवळ ९० रुपये दिले जाते, ते ११० करण्याची मागणी पवारांनी केली.  त्यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील पाटील यांनी चारा अनुदानात वाढ करत प्रत्येक जनावरामागे १०० रुपये देण्याची घोषणा केली.

फळबाग जळू लागल्या आहेत. आमच्या सरकारच्या काळात आम्ही प्रति हेक्टर ३५ हजार दिले होते, तितकी रक्कम द्यावी, दुष्काळग्रस्त भागात पाणी वाटपात होणारा घोटाळा थांबवावा, अशी विनंतीही शरद पवारांनी यावेळी केली. छावण्या सुरु झाल्या, पण ज्या संस्था छावण्या चालवतात त्यांना पैसे दिले गेले नाही. एका दिवसाचा संस्थांचा खर्च एक लाख रुपये आहे. संस्था महिनाभर छावण्या कशा चालवणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विमा पैसे मिळलेले नाही. फळबाग योजनेचा विमा का मिळाला नाही ?, असा सवाल पवार यांनी  केला.