शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त नाना काटे सोशल फाऊंडेशनकडून सांगवीत शनिवारी रोजगार मेळावा

0
699

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरदपवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. ८) भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालय येथे सकाळी साडेनऊ वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाटन होणार असल्याची माहिती संयोजक नगरसेवक नाना काटे यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी (दि. ४) दिली.

यावेळी नगरसेविका शीतल काटे,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, सुनील गव्हाणे, कुणाल थोपटे, विकास शिंदे, सागर कोकणे, सुनील काटे, शंकर काटे आदी उपस्थित होते.

नगरसेवक नाना काटे म्हणाले, “या रोजगार मेळाव्यात संगणक, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, मॅन्युफॅक्चरिंग, औषध, बांधकाम, उत्पादन, विपणन, विक्री, सेवा, केमिकल, फायनान्स, प्रिंटींग टेक्नॉलॉजी, बँकिंग क्षेत्र, हॉस्पीटल, हाऊस किपींग, सुरक्षा, बिपिओ आदी क्षेत्रातील ५० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये इन्फोसीस, टेक महिंद्रा, जस्ट डायल, डब्लू. एन. एस, बी. व्ही. जी इंडिया, टाटा उद्योग समूहातील कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांचे प्रतिनिधी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. या रोजगार मेळाव्यातून ३००० पेक्षा जास्त बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

या रोजगार मेळाव्यात मोफत प्रवेश असून यामध्ये दहावी पासून ते पदव्युत्तर त्याचप्रमाणे आय. टी. आय., डिप्लोमा विविध औद्योगिक कोर्सेस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन तसेच पिंपळेसौदागर येथील नाना काटे सोशल फाउंडेशन कार्यालयात प्रत्यक्ष भेटून नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम असतील. मेळाव्याला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे ,राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, युवा नेते पार्थ अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बेरोजगार तरुणांनी www.nanakate.org या संकेतस्थळावर आपले नाव नोंदवावे किंवा 9860001112 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच मेळाव्याच्या दिवशी सकाळी ८ वाजता कार्यक्रमस्थळी नोंदणी करून बेरोजगार सहभागी होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.”