कासारवाडीत एटीएम मशीनशी छेडछाड करुन अज्ञाताने स्टेट बँकेला घातला ९० हजारांचा गंडा

0
562

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – एटीएम मशीनशी छेडछाड करुन अज्ञात आरोपीने अॅक्सीस बँकेचे एटीएम वापरुन भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममधून ९० हजारांची रोकड काढून बँकेला गंडा घातला. ही घटना ५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान कासारवाडीतील भारतीय स्टेट बँक पिंपरी शाखा येथे घडली.

याप्रकरणी जयश्री सतीश अय्यर (वय ४३, रा. जे ४०१, सफायर पार्क, पार्क स्ट्रीट, काळेवाडी फाटा) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात एटीएमधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत अज्ञात ठगाने अॅक्सीस बँकेचे तीन वेगवेगळ्या एटीएम कार्डचा वापर करुन कासारवाडी येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड करुन वेळोवेळी एकूण ९० हजारांची रोकड काढून घेऊन बँकेला गंडा घातला. याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.