शरद पवारच माढा लोकसभा लढवतील – विजयसिंह मोहिते-पाटील

0
1429

सोलापूर, दि. ९ (पीसीबी) – माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच निवडणूक लढवतील, असे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज (शनिवार) स्पष्ट केले आहे. सांगोला (ता.सोलापूर) येथे  दुष्काळ परिषदेत मोहिते-पाटील बोलत होते.

दरम्यान, माढ्यातून निवडणूक लढवण्याबाबत विचार करू, असे सूचक विधान पवार यांनी नुकतेच केले आहे. आता मोहिते पाटील यांच्या विधानानंतर शरद पवार काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार यावर  चर्चा सुरु झाली आहे. माढातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवार यांनी येथून निवडणू्क लढवण्याची मागणी लावून धरली आहे.

दरम्यान, या परिषदेला राष्ट्रवादीसह शेतकरी कामगार पक्षाचे नेतेही उपस्थित होते. माढा लोकसभा मतदारसंघात सांगोला विधानसभा मतदारसंघ येतो. शेकापचे आमदार गणपतराव देशमुख या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. शरद पवार माढा येथून उभे राहणार असतील, तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे शेतकरी कामगार पक्षाने स्पष्ट केले आहे.