शंभरहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
1042

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत वाहन चोराला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वाकड पोलीसांनी केली.

राजू बाबुराव जावळकर (वय ५०, रा. कोल्हेवाडी, ता. हवेली.) असे शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्यासह त्याचा साथीदार सोमनाथ सुभाष चौधरी (वय ३२, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाणे हद्दीतून फेब्रुवारी २०१८ मध्ये टाटा कंपनीचा छोटा हत्ती (एमएच/१२/एफडी/६४२३) हा टेम्पो चोरीला गेला होता. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना वाकड पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली या प्रकरणातील चोरीचा टेम्पो  हा खेड शिवापूर येथे आहे. यावर पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन शोध घेतला असता एका शेड मध्ये आरोपी राजू आणि सोमनाथ हे दोघेही गॅस कटरच्या साहाय्याने तो टेम्पो कट करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने त्या दोघांना ताब्यात घेऊन टेम्पो जप्त केला. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी हा टेम्पो रहाटणी येथील बीआरटी रोडवरून चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून दोघा आरोपींना अटक करण्यात आली.

आरोपी राजू जावळकर याच्यावर पुणे शहर, सातारा, नगर येथे तब्बल १०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तर सोमनाथ चौधरी याच्यावर २० ते २५ वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील दोन, वाकड, इंदापूर, चाकण, तळेगाव दाभाडे, कराड शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सात वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, सहाय्यक पोलीस निरीक्षक एन डी सस्ते, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी देविदास शेळके, डी. डी. सणस, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, नितीन ढोरजे, जावेद पठाण, सुरेश भोसले, प्रमोद भांडवलकर, रमेश गायकवाड, विक्रम जगदाळे, दीपक भोसले, भैरोबा यादव, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, शाम बाबा, मधुकर चव्हाण, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने केली.