पिंपळेसौदागरमधील वसंत अव्हेन्यू सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू

0
729

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – पिंपळेसौदागर येथील वसंत अव्हेन्यू सोसायटीने आपल्या सोसायटीत तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. सुमारे एक हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशिनरीद्वारे खत निर्मिती करण्यात येते. या स्तुत्य उपक्रमाचे राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

वसंत अव्हेन्यू सोसायटीत एकूण २५० सदनिका आहेत. या सोसायटीत दररोज एकूण एक टन ओला कचरा संकलित केला जातो. ओला व सुका कचऱ्याचे अलगीकरण करून तो सोसायटीतील प्लँटमधे संकलित करण्यात येतो. सध्या सोसायटीच्या एकाच विभागात हे काम सुरू करण्यात आले आहे. एकूण एक टन ओला व सुका कचऱ्यापासून सोसायटी परिसरातच खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सोसायटीतील सर्व नागरीक या उपक्रमात योगदान देत आहेत. संकलित झालेला कचरा प्लँटपर्यंत पोचविण्यासाठी सोसायटीच्या परिसरात जागोजागी कचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. जागेवरच ओला व सुका कचऱ्याचे अलगीकरण केले जाते. सोसायटीचा प्रत्येक कोपरा आणि आवारात ओला व सुका कचरा संकलनासाठी डस्टबिन ठेवण्यात आले आहेत.

सोसायटी परिसर व उद्यानातील पडणारा पालापाचोळा, घरातील कचरा एका ठिकाणी संकलित केला जातो. तयार होणाऱ्या खताचा सोसायटीतील फुलझाडे, उद्यानातील झाडांना उपयोग करण्यात येणार आहे. गरजेपेक्षा आधिक संकलित झालेल्या खताची मागणीनुसार विक्री करणार असल्याचे सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले. या खतनिर्मिती प्रकल्पाचे राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी सोसायटीचे चेअरमन राहुल घरटे, सेक्रेटरी अतुल रीचारीया, निधी बाबर, राजू पानसरे, आदित्य विग, राजेंद्र जठार, विकास जंगले, दिनेश पाटील व सोसायटीतील रहिवाशी उपस्थित होते.

कचऱ्यापासून खत निर्मिती हा उपक्रम सर्वच मोठ्या सोसाट्यांनी राबविल्यास कचरा बाहेर येणार नाही. तसे झाल्यास पिंपरी चिंचवड शहराचे स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू राहिल. माझ्या प्रभागातील सोसायट्यांसाठी लागणारी मदत व सहकार्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे नगरसेवक नाना काटे यांनी सांगितले.