वॉट्सअप ग्रुपवर ‘कुत्रे’ म्हणाला म्हणून एकाचा निर्घृण खून

0
866

औरंगाबाद, दि. १५ (पीसीबी) – वॉट्सअप ग्रुपवर ‘कुत्रे’ म्हणाला म्हणून एका प्लॉटिंग एजंटला १५ ते २०  जणांच्या टोळक्यांनी तलवार, चाकू, रॉड आणि काठीने जबरमारहाण करुन भर चौकात निर्घृण खून केला. तर मृताच्या भाच्याला देखील गंभीर जखमी केले. ही थरारक घटना रविवारी (दि.१४) सायंकाळी सव्वापाचच्या  सुमारास हर्सूल येथील फातेमानगर चौकात घडली.

मोईन महेमूद पठाण (वय ३५, रा. फातेमानगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मोईनचा भाचा इरफान शेख रहीम शेख (वय २४, रा. बेरीबाग, हर्सूल) हा गंभीर जखमी झाला असून, त्याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हर्सूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोईन पठाण हे हर्सूल येथे प्लॉटींग, जमीन खरेदी-विक्री व्यवहारात एजंट म्हणून काम करायचे. गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शेखलाल रसूल पटेल, रफीक रसूल पटेल, शोएब सलीम पटेल आणि इतर काही लोकांचा त्यांना विरोध होता. चार दिवसांपूर्वी मोईन यांनी एका वॉट्सअप ग्रुपवर टाकलेल्या मेसेजमध्ये काही जणांना कुत्रे असे संबोदले होते. हा मेसेज वाचून मारेकऱ्यांपैकी काही जणांनी त्यांना दम असेल तर नाव घेऊन मेसेज टाक असे धमकावले होते. योग्य वेळी कुत्र्यांची नावेही जाहीर करेन आणि त्यांच्यासमोरही येईन, असे उत्तर दिले होते.

यावर रविवारी सायंकाळी संशयित मारेकऱ्यांनी मोईनला गावातील फातेमानगर चौकात बोलावले. काहीतरी विपरीत होऊ शकते, ही बाब मोईनच्या लक्षात आल्याने त्यांनी भाच्याला फोन करून फातेमानगरात येण्यास सांगितले. इरफान मित्राला सोडण्यासाठी जात असताना त्याला रस्त्यात सोडून तो फातेमानगर चौकाकडे गेला. तेथे १५ ते २० जणांच्या टोळक्याने चोहोबाजूने मोईनला घेरून ते त्याच्यासोबत वाद घालत होते. तेव्हा काही जणांनी अचानक चाकू,तलवार,लाठ्या आणि रॉडने त्याच्यावर हल्ला चढवला. यामुळे मोईन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मदतीसाठी धावलेल्या इरफानच्या डोक्यातही रॉड घातला. मोईन घटनास्थळीच बेशुद्ध पडला. घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी इरफानला आणि अन्य लोकांनी मोईनला घाटीत दाखल केले. मात्र मोईन याचा मृत्यू झाला तर इरफान हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. हर्सूल पोलीस तपास करत आहेत.