वीजबिलात पन्नास टक्के माफी मिळेपर्यंत लढू…..निलेश विश्वकर्मा

0
238

पिंपरी,दि. 28 (पीसीबी) – राज्यात सुरु असणा-या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने मराठा समाजासह उपेक्षित ओबीसींना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे दृष्टे नेते आहेत. समाजातील अतिवंचित घटक तसेच सर्व समाजासाठी काम करणारे बहुजनांचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांनी केलेले हे ‘सोशल इंजिनिअरींग’ हेच खरे सोशल इंजिनिअरींग आहेत. लॉकडाऊनमुळे देशभर नैराश्य पसरले होते, त्यामुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे यासाठीच पंढरपूरला मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केले. लॉकडाऊन काळात वीज ग्राहकांना अवास्तव वीजबील महावितरणने दिले आहे. यासाठी ग्राहकांचा लढा उभारुन वीजबिलात पन्नास टक्के माफी मिळेपर्यंत लढू असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश युवक अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी पिंपरी येथे केले.

शनिवारी पिंपरी येथे वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी विश्वकर्मा बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, प्रदेश युवक महासचिव राजेंद्र पातोडे, युवक प्रदेश सदस्य ऋषीकेश नांगरे पाटील, विशाल गवळी, प्रदेश प्रवक्ता संतोष संखद, शहर कार्याध्यक्ष राजन नायर आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेनंतर पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृहात युवक – युवतींचा मेळावा झाला. या मेळाव्यात शेकडो युवक युवतींनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

विश्वकर्मा म्हणाले की, वीजबिलांच्या तक्रारी सह नागरीकांना भेडसावणा-या समस्यांवर सक्षम पर्याय उभारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व संपर्क कार्यालयात तक्रार निवारण केंद्र सुरु करण्यात येईल. या माध्यमातून पिंपरी चिंचवड मनपामधील भ्रष्टाचारी अधिकारी व पदाधिका-यांना धडा शिकवला जाईल. या महापालिकेत ठेकेदारांचे भले करण्यासाठी काम केले जाते. ते थांबविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवक काम करतील. सोशल मिडीयात सक्रिय असणा-या युवक, युवतींनी महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करण्यासाठी व बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित आघाडीचे सभासदत्व स्विकारावे असेही आवाहन निलेश विश्वकर्मा यांनी यावेळी केले.

वंचित बहुजन आघाडीची पक्षीय भुमिका युवकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच सदस्य नोंदणी अभियानासाठी निलेश विश्वकर्मा यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरु आहे. त्या अंतर्गत शनिवारी पिंपरी चिंचवड आणि रविवारी पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या नोंदणी अभियानात दहा लाख नोंदणीचा संकल्प आहे. वीजबिलात पन्नास टक्के सवलत द्यावी. राज्य शासना मधिल नोकरीसाठी आदीवासींच्या राखीव जागांवर जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे रिक्त असणा-या जागांवर आदिवासी उमेदवारांनाच नोकरी द्यावी. एमपीएससीच्या भरती प्रक्रियेत मराठा समाजाच्या कोट्यातील जागा वगळून उर्वरित जागांची भरती सुरु करावी. या तीन मुद्यांवर राज्यभर होणा-या या मेळाव्यांमध्ये जगजागृती करण्यात येणार आहे. अशी माहिती युवक प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.