विश्व संवाद केंद्र व क्रांतिकारक चापेकर स्मारक समितीच्या वतीने नारद जयंती उत्साहात साजरी

0
660

चिंचवड,  दि.२६ (पीसीबी) –  आपल्या संस्कृतीत पत्रकारितेतील पितृपुरूष देवर्षी नारद मुनी हे एक विद्यापीठच होते, असे प्रतिपादन न्यूज भारती चे संपादक व मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे  संयोजक विराग पाचपोर यांनी आज (रविवार) येथे केले.

विश्व संवाद केंद्र पुणे व क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती चिंचवड तर्फे येथील क्रांतिविर चापेकर वाड्यात आयोजित देवर्षी नारद जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

यावेळी पाचपोर  यांनी नारद जयंती दिनाचे महत्व विशद केले. तसेच त्यांनी पूर्वांचलातील स्थित्यंतर हा विषय मांडला , पूर्वोत्तर भारतातील आधीची परिस्थिती , प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्या भागात केलेली सेवा कार्ये, विद्या भारती च्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील भरीव काम, उभी झालेली शाळा, महाविद्यालये , जनजातीय बांधवांची स्थिती , तेथील विकास या सर्व विषयावर त्यांनी सविस्तर विवेचन केले.

या कार्यक्रमाला  क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह विलास लांडगे, विश्व संवाद केंद्राचे मिलिंद कांबळे यांच्यासह पत्रकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी- चिंचवड मधील  प्रमुख कार्यकर्ते  आदी  उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व देवर्षी नारद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.  त्यानंतर  सर्व पत्रकार वृंदाचा सत्कार करण्यात आला.  प्रास्ताविक मिलिंद कांबळे यांनी केले.  तर आभार चापेकर स्मारक समितीचे सहकार्यवाह रवींद्र नामदे यांनी मानले.