सत्तारोहण; नरेंद्र मोदींचा ३० मे रोजी शपथविधी

0
565

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – नरेंद्र मोदी येत्या ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा होणार आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीदेखील याचवेळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रपती भवनाकडून  आज ( रविवारी)  सायंकाळी देण्यात आली आहे.   

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे. तत्पूर्वी शुक्रवारी मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रपतींकडे राजीनामे सुपूर्द केले.

मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीत ३०३ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३५३ जागा मिळाल्या आहेत. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला मंत्रीपद मिळते,  याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळय़ासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना निमंत्रण दिले जाणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय, रशिया, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि सार्क देशांच्या नेत्यांनाही या सोहळय़ासाठी खास आमंत्रित केले जाणार आहे.