विश्वचषक होऊ द्या, धोनीची पोलखोल करतो ! युवराज सिंहचे वडील भडकले

0
760

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निवृत्तीनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला. बीसीसीआयने युवराजसारख्या खेळाडूला निवृत्त होण्यापूर्वी एक सामना खेळू द्यायला हवे होते, असे मत क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केले. युवराज आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातले तथाकथित द्वंद्व सर्वांनाच माहिती आहे. युवराजच्या निवृत्तीनंतर त्याचे वडील योगराज सिंह यांनी धोनीवर आपला निशाणा साधत, युवराजत्या निवृत्तीला धोनी अप्रत्यक्षरित्या कारणीभूत असल्याची टीका केली आहे.

आपला मुलगा भारतीय संघातील राजकारणाचा बळी ठरल्याचे योगराज सिंह यांनी म्हटले आहे. युवराजच्या निवृत्तीमागे एक मोठा कट असल्याचेही योगराज यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे. “भारतीय संघातील अनेक माजी खेळाडूंना योग्य पद्धतीने निरोप दिला गेला नाही. गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग यांच्यासोबत जे घडले तेच आता युवराजसोबत घडले. व्ही.व्ही.एस.लक्ष्मण सारख्या महान खेळाडूलाही अशाच पद्धतीने निवृत्ती स्विकारावी लागली. यासाठी केवळ एकमेव माणूस जबाबदार आहे.” नाव न घेता योगराज यांनी धोनीला आपल्या टिकेचे लक्ष्य बनवले.

मुलाखतीदरम्यान योगराज यांना तुमच्या आरोपांचा रोख धोनीकडे आहे का असा प्रश्न विचारला….मात्र योगराज यांनी सध्या विश्वचषक सुरु असल्यामुळे मी कोणाचेही नाव घेणार नाही असे म्हटले आहे. गेली १५ वर्ष तो घाणेरडे राजकारण खेळतो आहे. कित्येक खेळाडूंचे आयुष्य त्याने बरबाद केले आहे. विश्वचषक संपू द्या, या सर्व गोष्टी मी पुढे आणणार आहे. तो आयुष्यभर ही गोष्ट लक्षात ठेवेल. योगराज यांनी आक्रमक पद्धतीने आपली भूमिका मांडली.

“एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर शांत बसून ती पाहत राहणे हे मला जमत नाही. मी नेहमी खरे बोलणारा माणूस आहे, ज्यावेळी मी खरे बोलायला सुरुवात करेन त्यावेळी कोणीही बोलू शकणार नाही. मी आता आरोप करुन विश्वचषकात संघाचे मनोधैर्य कमी करणार नाही.” योगराज पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.