विशाखापट्टणम कसोटीत भारताचा आफ्रिकेवर २०३ धावांनी विजय

0
340

विशाखापट्टणम,  दि. ६ (पीसीबी) – दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या पहिल्या कसोटीत  भारताने  २०३ धावांनी आफिक्रेला धूळ चारली. या विजयामुळे भारताला मालिकेत १-० अशी   आघाडी मिळाली.  दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात मोहम्मद शमी याने ५  आणि रवींद्र जडेजा याने ४ बळी  टिपत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी ९ बळींची आवश्यकता होती.  टीम इंडियाने दिवसाच्या दोन सत्रांमध्येच  विजयाच्या दिशेने आगेकूच केली.  

दिवसाच्या पहिल्याच सत्रात मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांच्या  भेदक  माऱ्यापुढे  दक्षिण आफ्रिकेचे एक मागोमाग एक असे  ७  फलंदाज  तंबूत धाडले. विजयासाठी केवळ दोनच बळी दूर असताना भारताने दुसऱ्या सत्रात २२ षटके फेकत या सामन्यावर आपले नाव कोरले. या सामन्यात ८ बळी मिळवणारा रविचंद्रन अश्विनने सर्वात जलद बळी मिळवण्याच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी साधली.

दरम्यान,  शनिवारी भारताने आपल्या दुसऱ्या डावात रोहित शर्माच्या (१२७) दमदार शतकाच्या जोरावर भारताने ३२३/४ च्या धावसंख्येवर आपला डाव घोषित केला. भारताला पहिल्या डावात ७१ धावांची आघाडी मिळाली होती. अशा प्रकारे आफ्रिका संघापुढे विजयासाठी ३९५ धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात आफ्रिकेने शनिवारी चौथ्या दिवसाचा खेळ संपताना ११ धावांवर आपला गडी गमावला. त्यानंतर आफ्रिकेच्या फलंदाजांना खेळपट्टीवर जम बसविता आला नाही.