दोन लाख सरकारी नोकऱ्या देणार; युवक काँग्रेसचा जाहीरनामा

0
427

मुंबई, दि. ६ (पीसीबी)  – आगामी विधान निवडणुकीसाठी प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. या जाहीरनाम्याची घोषणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच काँग्रेसच्या ‘वेक अप महाराष्ट्र’ या अभिनव उपक्रमाची  माहितीही दिली.  

या जाहीरनाम्यात ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत घेतलेली सर्व शैक्षणिक कर्जे माफ करण्यात येतील आणि १,९१,००० रिक्त सरकारी नोकऱ्यांची भरती पहिल्या १८० दिवसांत पूर्ण केली जाईल आणि आपले सरकार सत्तेवर येताच महापरीक्षा पोर्टल तत्काळ बंद केले जाईल,  अशा महत्त्वपूर्ण घोषणा  करण्यात आल्या आहेत.

प्रमुख शहरात युवकांसाठी वसतिगृहांची संख्या वाढवणे, सर्व दिव्यांग युवकांसाठी विनामूल्य उच्च शिक्षण देणे, गुणवान विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे, शेतकरी कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षणासाठी राज्य सरकारकडून बँक हमी देणे, सुशिक्षित बेरोजगारांना ५  हजार  रुपये बेरोजगार भत्ता देणे, भूमिपुत्रांना खासगी नोक-यांमध्ये ८० टक्के आरक्षण देण्यासाठीचा कायदा करणे, अशी आश्वासने देण्यात आली आहेत.