विरोधी पक्ष नेतेपदाबाबत पृथ्वीराज चव्हाणांची सावध प्रतिक्रिया  

0
447

मुंबई, दि. २६ (पीसीबी) –  राधाकृष्ण विखे-पाटील यांनी  विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता हे पद  कुणाकडे जाईल हे आत्ताच सांगता येणार नाही. विखे गेल्यावर काँग्रेसच्या आमदारांची संख्याबळ  किती राहते, त्यावरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.  

राधाकृष्ण विखे पाटील  यांनी गुरूवारी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता या पदावर काँग्रेस कोणाची वर्णी लावणार याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच विखे काही आमदारांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पद राष्ट्रवादीकडेसुद्धा जाऊ शकते.  या पार्श्वभूमीवर    पृथ्वीराज चव्हाण यांनी  याबाबत  सावध प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान,  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विखे पाटलांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे विखे आता २७ तारखेला काय घोषणा करणार याकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे. तर काँग्रेसमध्ये  राजकीय घडामोडींना मोठा वेग  आला असून  विखेंच्या नंतर पुढचे विरोधी पक्षनेते कोण?  यावर खल सुरू झाला आहे.