विनयभंग करणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर कारवाई करा – नीलम गोऱ्हे

0
125

मुंबई,दि.३०(पीसीबी) – राज्याचा कारभार हाकला जाणाऱया मंत्रालयातील इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्येच अवर सचिव स्तरावरील अधिकाऱयांनी उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱयाचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱहे यांनी केली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी निवदेनही दिले आहे.

मंत्रालयातील इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्येच अवर सचिव स्तरावरील अधिकाऱयांनी संबंधित महिलेचा ‘मला बरे वाटत नाही. मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव,’ असे म्हणत विनयभंग केला. एका मंत्र्याच्या अवर सचिवांनी असं वक्तव्य करणं निंदनीय आणि दुर्दैवी असल्याचे त्या म्हणाल्या. हा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी या ठिकाणी याच विभागाचे उपसचिवदेखील उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणीही गोऱहे यांनी केली आहे.

18 ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेमधील संबंधित महिला अधिकाऱयांनी लेखी तक्रार अर्ज संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे आणि त्यांच्या सचिवांनादेखील दिला आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या घटनेची निःपक्ष पद्धतीने चौकशी करावी आणि तोपर्यंत संबंधित अवर सचिव, उपसचिवांना कार्यमुक्त करावे अशी मागणीही गोऱहे यांनी केली आहे. मंत्रालयात दररोज शेकडोच्या संख्येने कामासाठी महिला येत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेही गोऱहे म्हणाल्या.