विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा ५०-५० चा फॉर्म्युला ?

0
314

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. या निवडणुकीत ५०-५० चा फॉर्म्युला मान्य करून  समसमान जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेससमोर ठेवला आहे.   

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली.  या बैठकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत   काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक मुंबई येथे झाली. या बैठकीत जागावाटपाचा राष्ट्रवादीने नवा फॉर्म्युला मांडला. विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी ५०-५० चा फॉर्म्युला  मान्य करून  समसमान जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने बैठकीत मांडला .

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी काँग्रेसच्या तुलनेत चांगली झाली  आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला ५० टक्के जागा सोडण्यात याव्यात, अशी मागणी करत राष्ट्रवादीने ५०-५० चा फॉर्म्युला मांडला.

दरम्यान,  मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा त्या-त्या पक्षाकडे राहतील. तसेच ज्या जागांवर जो पक्ष दुसऱ्या नंबरवर होता ती जागा त्या पक्षाकडे जाईल, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. त्यानुसार काँग्रेसला १०६ आणि राष्ट्रवादीला  ९५  जागा सोडव्यात.  तर उरलेल्या ८७ जागा  मित्रपक्षांना देण्यात याव्यात, असा प्रस्ताव काँग्रेसचा आहे.